Saturday, July 2, 2011

आमीर खानला एक पत्र...


प्रिय आमीर खान

आवं आमीर साहेब, म्या पैल्यांदा तुम्ची माफी मागतो बागा. म्या साधा खेडूत आणि ह्ये पत्र बित्र असा काही माझ्याच्यानं नीट नाही जमत, पन तरीबी म्हटलं कि लिहावच. आता माफी याच्याच साठी कि हे पत्र काही पुस्तकात असतंय तसं 'नेहरूंची इंदिरेस पत्रे' सारखं तर बिलकुल नसणारेय बागा, पन मला जे काई सांगायचे हाय ते मी लिवनार हाव.

मी तुमचा लई मोट्टा चाहता हाई बागा. लई पिक्चर बघितले तुमचे मी. लोकांनी 'फना' फालतू आहे असं म्हणूनबी म्या तो बघितलाच. आवडला-नावडला तो भाग सोडा पन फकस्त तुमच्यासाठी त्यो म्या बघितला. सांगायचा कारण हेच कि म्या तुमचा लई मोट्टा fan म्हणतात ते हाय बागा. म्या तुमचा 'धोबी घाट' पन बघितला. आता माझ्यासारख्याच्या तो डोसक्यावरून गेला ते काय वेगळं सांगायला नको. आमच्या शहरातल्या मित्रांना लई आवडला म्हणे तो. पन जाऊ द्या. आम्हीच कुठे तरी कमी पडलो असणार. पन तुमी एक लई चांगलं केलं बगा. तुमी त्यात हिंदीतून बोलालेलं दाखवलं. आता आमच्या कानावर हि गोष्ट आली कि त्यातला काई भाग इंग्रजीतून हाय म्हणून. अवं बरं झालं तुमी ते पुणे-मुंबई सोडला तर दुसरी कडे हिंदीतून ठेवलं. नाई तर जेवडबी कळल्यासारखं वाटलं तेवडबी कळलं नसतं. त्यात तुमास्नी बगायला गेलो अन तुमीच जर इंग्रजीतून बोलला असता तर मग कायबी खरं नवतं बगा. आधीच तुमी निवडलेला विषय डोक्याचं भुस्कट पडणारा होता. जर का ते इंग्रजीतून असतं तर साधे लोक तर फिरकलेबी नसते.

आनी आजच तूमचा नवीन चित्रपट पहिला - 'देल्ली बेल्ली'. मराठीत त्यचं लई विचित्र होईल बगा - 'दिल्ली बेंबी'. आइकुनच हसायला येतंय. आनी काय सांगू, मला तर लई आवडला हा. मस्त होता बगा. काय त्या दाढी वाल्याला हागायला लागलेली असते. अवं आता एकाने  गोट्या खाजवून त्याच हाताने दिलीली तंगडी खाल्ली या शान्याने. असल्या हाताने शिवल्यावर त्या तंगाडीचे काय अमृत होणार होते! बसलं ते बेनं पूर्णवेळ पोटधरून, अवघडलेल्या बाइसारख. त्याला कुनी सुखाने परसात सुदा जाऊ नाही दिलं ह्याला. लई हसलो मी तर. हे इकडं बसलाय पोट रिकामं करायला प्यांट खाली ओदून आनी लोकं तिकडे गोळ्या झाडत्यात. चांगलं होता बगा ते. मला तर ती पोरगी बी आवडली. ती गोरी वाली नाही. ती दुसरी सावळी, कामिनी. अवं नावपण तसंच. काळजाला हात घालणारं. लई भाई दिसते हो ती.

आता मी पुन्हा हिंदी-इंग्रजीत जातो. आता हा चित्रपट सुदा बराचसा इंग्रजीत आहे म्हने. आनी खरा सांगू का? कुनी सांगायची पन गरज नाही असल्या गोष्टी. लगेच समजून येतंय. ते लोकं वेगळाच तोंड हलवतात, आनी तोंडातून काही तरी वेगळाच बाहेर पडतंय. त्याची तर मला गम्मत वाटते. असा काही पहिला कि ते झी, सोनी टीव्ही वरच्या वेगवेगळ्या वजन कमी करण्याच्या वस्तू विकानाऱ्या फिरंगींची आठवण येऊन हसू येतं.

आनी या चित्रपटच खूपच शिव्या आहेत हो. पन जाऊ द्या. तुमी आधीच सांगितलं होता कि फक्त मोट्या माणसांसाठी आहे हे म्हणून. पन हिंदीतून पाईल्यामुळं ते सगळं काही हिंदीतून ऐकायला मिळालं. देशी शिव्या कश्या ऐकायला एकदम खंगरी वाटत्यात. त्यापुढे इंग्रजी शिव्या एकदम मेंगळया.

असुद्या ते. माझ्यासारक्या बऱ्याच लोकांनी सांगितलं असल कि पिक्चर चांगलं हाय म्हणून. मी फक्त जास्ती आवडलेल्या गोष्टी सांगितल्या. तुमी असेच चांगले पिक्चर काढत राहावं हीच इच्चा.


                                                                                                                        - आपलाच एक चाहता.


ता.क. - तूमचा आईटम साँग सुदा लई आवडला बघा. एकदम जुन्या काळाच्या हेरोवानी.

1 comment:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...